डय़ुअल सिम मोबाईल Print E-mail
यांच्या द्वारा - राजेंद्र येवलेकर - लोकसत्ता   
duel_sim

मोबाईल ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही, मोबाईलमध्ये असलेले सिमकार्ड हा त्यात महत्त्वाचा भाग असतो. पूर्वी एका मोबाईलला एकच सिमकार्ड असे. आता एकाच मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड म्हणजे दोन मोबाईल नंबर एकच व्यक्ती एका वेळी वापरू शकते अशी व्यवस्था असलेल्या मोबाईलला डय़ुएल सिम मोबाईल असे म्हणतात.

सिमकार्ड हे त्या मोबाईल ग्राहकाची ओळख पटवणारे एक साधन असते व ते लहान आकाराचे असते. व्यक्तीचा मोबाईल फोन क्रमांक व मोबाईल कंपनी म्हणजे ऑपरेटरची माहिती त्या सिमकार्डमध्ये असते, एका व्यक्तीने एकाच वेळी दोन वेगवेगळ्या क्रमांकांचे मोबाईल वापरणे फारसे सोयीस्कर नसते. त्यामुळे डय़ुअल सिमकार्ड मोबाईल अस्तित्वात आला.

भारतात जीएसएम तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने त्यावर आधारित सिमकार्ड असतात. दोन सिमकार्ड बनवण्याची पद्धत पहिल्यांदा चीनमध्ये विकसित झाली. नोकिया, सॅमसंग व मायक्रोमॅक्स यांसारख्या कंपन्यांचे डय़ुअल सिम मोबाईल आता उपलब्ध आहेत. भारतातील वाढती बाजारपेठ तसेच वापर बघून या कंपन्यांनी आता ही दुहेरी सिमकार्ड असलेल्या मोबाईलची सुविधा दिली आहे.

स्टँडबाय मोबाईल नेटवर्कमध्ये एका वेळी एकाच मोबाईल कंपनीची सेवा वापरता येते. हँडसेटवरचे एक विशिष्ट बटन दाबले की, दुसरा मोबाईल क्रमांक वापरता येतो, अर्थातच हे फोन कमी किमतीचे असतात. अ‍ॅक्टिव्ह तंत्रज्ञानात मात्र मोबाईल सेटची किंमत जास्त असली तरी दोन्ही प्रकारचे नेटवर्क एकाच वेळी वापरता येतात. दोन्ही नेटवर्कचे कॉल व एसएमएस एका वेळी येऊ शकतात. वापर जास्त होत असल्याने यात बॅटरी लवकर संपू शकते, पण अधिक क्षमतेची बॅटरी असलेले डय़ुअल सिम फोनही बाजारात आहेत.

नोकियाचा सी २००, नोकिया एक्स १-०१(दोन सिमकार्ड), सॅमसंगचा चॅट ३२२ (दोन जीएसएम सिमकार्ड) व मायक्रोमॅक्स जीसी ३६०- ३ सिम (यात तीन सिमकार्ड) हे तीन डय़ुअल सिम मोबाईल असले तरी त्यांची वैशिष्टय़े वेगळी आहेत, किमतीही २८०० ते ४००० रुपयांपर्यंत आहेत. नोकियाचा सी-७ व एक्सएजचा एमटी ७११ (हा अजून बाजारात येत आहे.) हे जास्त प्रगत डय़ुअल सिमकार्ड फोन आहेत, त्यांच्यात सुविधा जास्त आहेत, पण त्यांच्या किमती जास्त आहेत.

सध्या हे प्राथमिक स्वरूपाचे फोन आहेत, त्यातही आणखी प्रगती होत जाईल. स्पाइस, अल्काटेल, फ्लाय, कार्बन अशा अनेक कंपन्यांचे डय़ुअल मोबाईल फोन उपलब्ध आहेत. या प्रकारच्या फोनमध्ये व्हिडीओ, चॅटिंग, बिल्ट इन कॅमेरा, एमपी ३ किंवा एमपी ४, इंटरनेट, कीबोर्ड, एफएम रेडिओ, ऑनलाईन गेमिंग, ब्लूटूथ, वायफाय या सुविधा मिळतात. त्यांची मेमरी वाढवण्याचीही सोय असते.

राजेंद्र येवलेकर - लोकसत्ता
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
Type in:

आपलं स्वागतRocketTheme Joomla Templates